
सांगली : मिरज ग्रामीण पोलिसांनी शासनाने निर्बंध घातलेल्या सुगंधी तंबाखू व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण ९ लाख १६ हजार २०८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तंबाखू व गुटखा वाहतूक करणारी चारचाकी गाडीही हस्तगत करण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईचे नियोजन सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या नेतृत्वाखाली, सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गुरव, पोलीस उपनिरीक्षक दिपक माने आणि अझर मुलाणी, तसेच पोलीस हवालदार महेश कांबळे, शशिकांत जाधव, सचिन जाधव, पोलीस नाईक विकास भोसले, आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनिल देशमुख, विनायक कडाळे, वसंत कांबळे, प्रविण खंचनाळे, महेश माने, सनी तोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुणराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव फाटा ते म्हैशाळ रोड मार्गावरून संशयास्पद गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे कळाल्यानंतर सुभाषनगर येथे सापळा रचण्यात आला. त्यानुसार एका चारचाकी गाडीला थांबवून तपासणी केली असता, गाडीत मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू आणि गुटखा साठा सापडला.
गाडीतून संशयित आरोपी पंकज विलाश माने (रा. इंगळी, बेळगाव), अक्षय वसंत माळी (इंगळी, बेळगाव), दिपक शिवाप्पा कांबळे (शिरगुप्पी, बेळगाव) हे तिघे आढळले. चौकशीत त्यांनी कबुली दिली की, हा मुद्देमाल सांगलीतील आकाश किशोर रामचंदानी याच्याकडून खरेदी करून कर्नाटकमधील इंगळी येथे नेत होते. पुढील तपासात आकाश याने गुटखा व तंबाखूचा साठा बिरमा करमचंद गिडवाणी (झुलेलाल स्टोअर, सांगली) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. गिडवाणीच्या दुकानातून ६८ हजार किमतीचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुद्देमालामध्ये विविध प्रकारचे विमल, गोवा, राज कोल्हापुरी, राज जर्दा, मुसाफिर आदी ब्रँडच्या सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा समावेश असून, त्यातील काही नमुने रासायनिक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गुरव करीत आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.