
सर्किट बेंच इमारत नूतनीकरणाच्या कामाची पाहणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला न्यायालयीन गौरवशाली इतिहास लाभला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक नवीन न्यायालये आणि उपन्यायालय स्थापन केली. कोल्हापूर संस्थानात न्यायालयीन सुधारणा लागू करत सामाजिक न्यायावर जोर दिला आणि कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. सर्किट बेंचसाठी प्रस्तावित केलेली जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत दीडशे वर्षाहून अधिक जुनी असून, याठिकाणाहून संस्थान काळापासून न्यायदानाचे पवित्र काम केले गेले. त्यामुळे सर्किट बेंचच्या रूपाने स्थापन करण्यात आलेल्या न्यायमंदिराला साजेसे आणि दर्जेदार काम करा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दि.१८ ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या नियमित कामकाजास सुरवात होणार असल्याने सुरु असलेल्या इमारत नूतनीकरण कामांची पाहणी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
सुरवातीला सर्किट बेंचच्या इमारत नूतनीकरण कामाची पाहणी करून प्रस्तावित असलेल्या कामांचा, सुरु असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. यासह आवश्यक असलेल्या यंत्रणा, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
ते पुढे म्हणाले कि, मंजूर झालेल्या सर्किट बेंच मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असून, त्यामुळे रोजगार निर्मितीसह इतर क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे सर्किट बेंच मुळे कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकास झपाट्याने होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयातील कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सुमारे ८० हजार खटले सर्किट बेंच कडे वर्ग होणार आहेत. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पक्षकारांना हे एकप्रकारे न्यायाचे मंदिर ठरणार आहे. त्यामुळे न्यायमंदिराचा कामात विनादिरंगाई करता दर्जेदार काम करण्याचे उद्दिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आहे. हे उद्दिष्ठ नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्वच यंत्रणा सुसज्ज करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.