
सांगली : डिग्रज येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यात मळीमिश्रित पाण्याचा शिरकाव झाल्याने नदीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. पाण्याचा रंग काळपट झाल्याचे स्पष्टपणे जाणवत असून, नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यापूर्वीही काही साखर कारखान्यांकडून वारंवार असे मळीमिश्रीत पाणी नदीत सोडले जात असल्याचे प्रकार घडले असतानाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने यावेळीही कारखानदारांचे मनोबल वाढले आहे.
नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मिसळले जात असल्याने जलचरांचे जीवन धोक्यात आले असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उन्हाळ्यातदेखील अशाच प्रकारामुळे मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पावसामुळे नदीला पाणी आल्याचे कारण सांगत काही कारखानदारांनी पुन्हा मळी सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित कारखान्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ अद्यापही झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे.