
सांगली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थींनी स्टेशन चौक येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासोबत एकजूट दर्शवत खासदार विशाल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी ह.भ.प. तुकारामबाबा महाराज व इतर प्रतिनिधींशी चर्चा करत आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या नावाखाली राज्यातील युवकांची फसवणूक झाली आहे, असा घणाघात खासदार पाटील यांनी महायुती सरकारवर केला. कंत्राटी नेमणुका करून त्यांना वेळेवर पगार न देणे आणि ११ महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा बेरोजगारीच्या गर्तेत लोटणे, ही शासनाची तरुण विरोधी भूमिका असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आगीतून फुफाट्यात अशी तरुणांची अवस्था झाली असून, आता पुढे काय? हा प्रश्न युवकांना अस्वस्थ करणारा आहे, असेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर शासनाने युवकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे व न्याय द्यावा, अशी ठाम अपेक्षा खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली.