
कोल्हापूर : वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ५ ऑगस्टपासून १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत स्व. आण्णासाहेब लठ्ठे चौक (किरण बंगला), प्रा. सुभाष राणे चौक, सासणे मैदान, कोयास्को चौक आणि दिघे हॉस्पिटल परिसरात एकेरी वाहतूक योजना लागू करण्यात आली आहे. या भागातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन, वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.
या नियोजनात –
- किरण बंगला ते सासणे मैदान हा मार्ग आता एकदिशा असेल; उलट दिशेने प्रवेश बंद.
- सासणे मैदान ते आदित्य कॉर्नर हा मार्ग एकदिशा राहील; उलट दिशेने येणाऱ्या वाहनांना बंदी.
- कोयास्को चौक ते दिघे हॉस्पिटल हा मार्गही एकदिशा राहणार असून, उलट दिशेने येणाऱ्यांनी अनुकामिनी मंदिर – सर्व्हिस रोड – रेल्वे उड्डाणपूल मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा निर्णय प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे. सूचना किंवा हरकती १५ दिवसांच्या आत पोलिसांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.