
कोल्हापूर : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, उचगाव ब्रीजखालून येणाऱ्या जड-अवजड मालवाहतूक वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही बंदी एस.टी., के.एम.टी., शासकीय, लष्करी व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना लागू नसेल. पुणे-बेंगळुरू महामार्गासह हुपरी व रेंदाळ मार्गावरून शहरात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांकडून वारंवार येत होत्या. त्यामुळे ५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे.
या निर्णयासंदर्भात नागरिक, वाहनचालक व रहिवाशांनी सहकार्य करावे, तसेच हरकती व सूचना १५ दिवसांच्या आत शहर वाहतूक नियंत्रण शाखा, गांधी नगर पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.