
सांगली : नांदणी मठातून महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्रात नेताना जैन समाजाच्या भावना दुखावल्याने उद्रेक झालेल्या नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यांनी नमूद केले की, नांदणी मठाची १२०० वर्षांची परंपरा असून, महादेवी हत्तीणी १९९२ पासून या मठात आहे. हत्तीणीशी भावनिक नाते जुळलेल्या नागरिकांनी भावनावश होऊन प्रतिक्रिया दिली असून, अशा परिस्थितीत दाखल गुन्हे मागे घेणं गरजेचं आहे. सुमारे १६० नागरिकांवर गुन्हे दाखल असून, ते सहानुभूतीपूर्वक मागे घेण्याची विनंती त्यांनी केली.
तसेच, महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.