
मुंबई – नांदणी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील माधुरी (महादेवी) हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांनी या विषयावर जोरदार भूमिका मांडत याचिका दाखल करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन याचिका दाखल करेल असे सांगितले. तसेच, मठाने आपल्या याचिकेत राज्य सरकारला पक्षकार म्हणून समाविष्ट करावे, अशी सूचना केली.
हत्तीणीच्या निगेची व्यवस्था करण्यासाठी डॉक्टरांसह विशेष पथक तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गरज भासल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्था उभी करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने या सुविधांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात येईल. या प्रकरणात ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तेही मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.