
सांगली : महाराष्ट्र राज्य दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात सांगली जिल्हा वायरलेस विभागाने उल्लेखनीय यश मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील २८ युनिट्सपैकी सांगली विभागाची निवड झाली असून, ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशामागे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शन, तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर, अतीरिक्त रिपीटर उभारणी, सीसीटीव्ही व्यवस्थापन आणि युनिट्समधील सुसूत्रता कारणीभूत ठरली. पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंमलदारांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे.
पुणे येथे आयोजित सन्मान समारंभात अपर पोलीस महासंचालक दीपक पांडवे यांच्या हस्ते वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.