
सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील जे नागरिक आपली थकीत पाणीपट्टी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संपूर्ण रक्कम भरतील, त्यांना थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्कामध्ये १००% माफी दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी ही माहिती दिली.
२०१९ मध्ये आलेल्या महापुरानंतर व कोविड-१९ च्या काळात पाणीपट्टी बिलांचे वितरण व वसुली व्यवस्थित होऊ शकली नाही. त्यामुळे मार्च २०२३ अखेर थकीत पाणीपट्टी रक्कम ६१ कोटींहून अधिक झाली. वाढत्या थकबाकीमुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे.
ही सवलत देण्याचा प्रस्ताव महासभेने २० जुलै २०२३ रोजी घेतला होता. शासनाच्या मान्यतेनंतर आता ही सवलत अमलात आणण्यात आली आहे. नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा, अन्यथा थकीत ग्राहकांचे पाणी कनेक्शन तोडण्याची मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.