
सांगली : नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणानंतर दबावाखाली काम करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संरक्षण देण्यासह, चौकशीविना अटक न करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाला सुरुवात केली. जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. परिणामी, शुक्रवारी शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले.
अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचा पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा निर्दोष अधिकाऱ्यांवर कारवाई करत असल्याची टीका करण्यात आली.
विनाचौकशी व शासनाची परवानगी न घेता अटकसत्र सुरू असल्याचा निषेध नोंदवण्यात आला असून, अतिरिक्त दूरदृश्यप्रणाली बैठका व सुटीच्या दिवशी लादलेला अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याचीही मागणी करण्यात आली. शनिवार व रविवार सुटी असल्याने सोमवारी सरकारकडून निर्णय न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.