
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात स्पष्ट केले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली महायुती म्हणून लढणे अवघड आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यातील गोकुळ या बलाढ्य आर्थिक गडातही सत्तांतर झाले असून, महायुतीच्या ताब्यात हा गड आल्याने नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशाची स्पर्धा रंगली. माजी नगरसेवकांसह अनेकांनी महायुतीत प्रवेश करताना उमेदवारीची खात्री मिळवली होती. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष ठेवला जाणार असल्याने स्पर्धा तीव्र होणार आहे.
ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांची नाराजी टाळणे हे महायुतीसमोरचे मोठे आव्हान आहे. अशा नाराज कार्यकर्त्यांसाठी महाविकास आघाडी हा पर्याय असू शकतो, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी निश्चित होणार असून, नाराजी, कुरबुरी आणि अपेक्षाभंग यांना हाताळणे हे महायुतीच्या नेत्यांची खरी कसोटी ठरणार आहे.