
आनूर : भारतीय सैनिक प्राणांची बाजी लावून भारतमातेच्या संरक्षणासाठी लढत आहेत. त्यांच्या असीम त्यागामुळेच आम्ही भारतीय सुखी आहोत, अशी कृतज्ञता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. सैनिकांमुळेच आपण सारे भारतीय सुखाने चार घास खात आहोत, असेही ते म्हणाले.
आनूर ता. कागल येथे आजी-माजी सैनिक भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री. मुश्रीफ यांच्या १५ लाख निधीतून येथे सैनिक भवन उभारले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराजी माझी संघाचे अध्यक्ष बाबुराव नरके होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद रामा हणमा शिपेकर, शहीद अनिल हणमा शिपेकर, शहीद वसंत शंकर रेडेकर या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ऊन, वारा, पाऊस, बर्फ, थंडी अशा अनेक संकटांनी चहुबाजूने घेरलेले असतानाही भारत मातेसाठी हातावर प्राण घेऊन ते लढत आहेत. अशा आजी-माजी- सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे आपणा सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे. अलीकडच्या काळात जे जवान शहीद झाले, त्या सर्वांच्या कुटुंबीयांच्या मागे या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने खंबीरपणे उभा राहिलो.
सैनिकांच्या सेवेत धन्यता…….!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिलो. सैनिक भवन उभारणीच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांची सेवा करण्याची संधी मिळाली याचा मला फार आनंद वाटतो.
कर्नल विलासराव सुळकुडे, आनूर आजी- माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव नरके, प्रभाकर कापडे, हिंदुराव भोळे, काशिनाथ जिरगे, बाळासाहेब वांगळे, माजी सरपंच रवीकिरण सावडकर, सूर्यकांत बेनाडे, उमेश पाटील, आप्पासो भांगरे, सुरेश चौगुले, सुभाष चौगुले, बाळासाहेब चौगुले, विनायक खोत, तातोबा गोते आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत आनूर आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष बाबुराव नरके यांनी केले. प्रास्ताविक कर्नल विलासराव सुळकुडे यांनी केले. सूत्रसंचालन सागर कोळी यांनी केले. आभार प्रभाकर कापडे यांनी मानल.