
कोल्हापूर / शाहूवाडी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर येथील उदगिरी केंद्रातील चार शाळांमध्ये ढवळेवाडी, तळीचा वाडा, केदारलिंगवाडी आणि गुरववाडी येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य तसेच अन्य साहित्य वस्तुरूपाने देण्यात आले.
या उपक्रमासाठी तब्बल २३७ दानशूर दात्यांनी मदतीचा हात पुढे केला असून एकूण १,४७,३३६ रुपये जमा झाले. मोठ्या स्वरूपात मदत करणाऱ्यांमध्ये सुहास मदगे (डिवाईन स्माईल कन्स्ट्रक्शन, शिरोली – ५,००१), विजयसिंह निंबाळकर (बजाज ऑटो, चाकण – ५,०००) यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींचा समावेश होता. याशिवाय वह्या, पेन, शालेय साहित्य, खेळणी, कपाट, टीव्ही, माईक-साऊंड सिस्टम, स्पोर्ट्स ड्रेस, चप्पल, छत्र्या अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शाळांमध्ये मुलांच्या आनंदासाठी क्रिकेट बॅट, फुटबॉल, चेस बोर्ड, बॅडमिंटन यांसारखे खेळाचे साहित्य देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना लाडू, ज्यूस, चॉकलेट, बिस्कीट व खाऊ वाटपही करण्यात आले.
शाळांच्या अपेक्षित गरजा पूर्ण केल्यानंतरही मदतीचा ओघ सुरू राहिल्याने उर्वरित मदत केसनंद गावातील निर्मल बहुउद्देशीय संस्था या मुलींच्या अनाथ आश्रमाला देण्यात आली. या आश्रमाला २३,५०० आर्थिक मदत करून किराणा, शाळेची फी व थकीत भाड्याच्या अडचणी सोडविण्यास हातभार लावण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकल्याण कामगार संघटना तसेच बजाज ऑटोतील आणि बाहेरील मित्रांनी सिंहाचा वाटा उचलला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.