
कागल : तालुक्यातील महा ई सेवा, राजर्षी शाहू सुविधा व आपले सरकार सेवा केंद्रांकडून नागरिकांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. तालुक्यात एकूण ७५ केंद्रांमार्फत शासनाने निर्धारित शुल्कावर विविध दाखले दिले जातात. मात्र काही केंद्र चालक अतिरिक्त शुल्क घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत तहसील कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले असून, दरफलकावर नमूद केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम मागितल्यास तात्काळ तहसील कार्यालयात पुराव्यासह तक्रार नोंदवावी किंवा tahsildarkagal@gmail.com वर मेलद्वारे कळवावे, असे सांगण्यात आले आहे. संबंधित केंद्र चालकांकडून नियमबाह्य शुल्क आकारल्याचे आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे.