
सांगली : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीची पार्श्वभूमी गडद झाली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज आयर्विन पुलाजवळील कृष्णा घाट व हरिपूर घाट येथे प्रत्यक्ष पाहणी करून सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे, डॉ. रविंद्र ताटे, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण व एनडीआरएफ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे यांनी आपत्ती काळातील उपाययोजना व दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार मळा, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच गरज पडल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी केवळ शासकीय यंत्रणांच्या सूचनांवर विश्वास ठेवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, चांदोली व कोयना धरणांतून विसर्ग वाढल्याने कृष्णा व वारणा नदीची पाणीपातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.