
सांगली : भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले असून महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र विकसित होऊन विकासदर वाढवण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज उद्योग विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास तीन टप्प्यांत नियोजित असून वार्षिक उत्पन्न १ लाख ७७ हजार कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी उद्योगक्षेत्राच्या क्षमता विकसित करून सर्वांगीण विकासाला गती दिली जात आहे. उद्योजकांनी भावी काळाचा विचार करून आपल्या संकल्पना मांडाव्यात आणि जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतीतील समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही देत जिल्हाधिकाऱ्यांनी ईएसआयसी रुग्णालयासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच उद्योजकांचे महापालिका संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचे सूचित केले. पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासकीय विभाग व उद्योग संघटनांनी एकत्रित व्यवहार्य उपाय अवलंबावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रकल्प, वीजपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे, औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण, ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा, कचरा डेपो आदी विषयांवर चर्चा झाली.