
सांगली : जिल्ह्यातील गणेशोत्सव आणि मुस्लिम समाजाचा ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज खरे क्लब हाऊस, धामणी रोड, सांगली येथे झाली. बैठकीस जिल्ह्यातील प्रशासनिक अधिकारी, पोलीस अधिकारी, गणेश मंडळ व ईद ए मिलाद मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, मुर्तीकार, डॉल्बी चालक-मालक, डेकोरेटर्स तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या सूचनांमध्ये मुख्य चौकातील लाईट दुरुस्त करणे, बराच काळ बंद असलेले सीसीटीव्ही सुरू करणे, विसर्जन घाटांवर लाईट, बोटी व क्रेनची व्यवस्था करणे, तसेच शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे. या मागण्यांचा समावेश होता. यावर मनपा प्रशासनाने विसर्जन मार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच ४५ ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली असून कृष्णा घाटावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी विसर्जन कुंडांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की, सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या पुरस्काराच्या धर्तीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून उपविभागीय स्तरावर योजना राबवली जाणार आहे. एक गाव एक गणपती व एक वार्ड एक गणपती ही संकल्पना पुढे नेण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच मंडळांनी दहा दिवस दहा उपक्रम राबवावेत, जसे की आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, सायबर गुन्हे जनजागृती इत्यादी. पारंपरिक वाद्यांचा वापर करून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना डॉल्बीच्या आवाजामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत आणि ऐक्यपूर्ण वातावरणात पार पाडावेत. सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, आपले शहर सांगली मिरज हे ऐक्याचे प्रतीक असल्याने एकोपा राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, महापालिका अधिकारी, आरोग्य विभाग, परिवहन विभागाचे अधिकारी, तसेच विविध गणेश मंडळे, मुस्लिम संघटना, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.