
कोल्हापूर : शहरातील सिद्धार्थनगर परिसर काल रात्री रणांगणात बदलला. डीजे व फलक लावण्यावरून दोन गटांमध्ये दिवसभर सुरू असलेला वाद संध्याकाळी उग्र झाला आणि तुंबळ दगडफेक, वाहनांची तोडफोड तसेच आगीच्या घटनांपर्यंत पोहोचला. दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह आठ जण जखमी झाले असून सर्वांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जमावाने ८ ते १० वाहनांची तोडफोड केली, तर एका वाहनाला आग लावण्यात आली. परिसरातील वीजतारा तोडल्याने संपूर्ण भाग अंधारात बुडाला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; मात्र मर्यादित फौजेमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होताच स्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, दोन्ही गटातील सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार फलक लावणे, डीजे व आतषबाजी यावरून वाद पेटला होता. कमानीजवळ पुन्हा झेंडा लावल्यानंतर आणि कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.