
मिरज : अनंत चतुर्दशी निमित्त शहरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजन व मनाई आदेश लागू केले आहेत. हे आदेश ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
मिरवणुकीचे मार्ग
चंदनवाडी (सांगली रोड), कुपवाड रोड, पंढरपूर रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका गांधी चौक, छत्रपती शाहू चौक/स्टेशन चौक, शास्त्री चौक मार्गे कृष्णाघाटाकडे जाणार आहेत. तसेच महात्मा गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, नागोबा कट्टा मार्गे गणेश तलावाकडे विसर्जन होणार आहे. कोल्हापूर ब्रिजकडून येणाऱ्या मिरवणुका फुले चौक, शास्त्री चौक मार्गे कृष्णाघाटाकडे जातील. मालगाव व सुभाषनगरकडून येणाऱ्या मिरवणुका दिंडीवेस, गाडवे चौक, दत्त चौक मार्गे गणेश तलाव अथवा कृष्णाघाट येथे पोहोचतील. किल्ला भागातील मिरवणुकीसाठी महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
मनाई आदेश व बंद रस्ते
गणेश विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी श्रीकांत चौक, स्टेशन चौक, हिरा हॉटेल चौक, फुलारी कॉर्नर, बॉम्बे बेकरी चौक, किसान चौक, दत्त चौक, जवाहर चौक, भोसले चौक, झारी मस्जिद कॉर्नर यांसह श्रीकांत चौक ते गणेश तलाव या मार्गावरील सर्व रस्त्यांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग
तासगाव फाट्याकडून सांगली–कोल्हापूरकडे जाणारी वाहने गांधी चौक–विश्रामबाग मार्गे वळवली जातील. मालगाव व टाकळी-बोलवाडकडून सांगलीकडे जाणारी वाहने दिंडीवेस–आळतेकर हॉल–कर्मवीर चौक–गांधी चौक या मार्गे नेली जातील. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दिंडीवेस–गाडवे चौक–शास्त्री चौक–फुले चौक–कोल्हापूर ब्रिज हा मार्ग उपलब्ध असेल. म्हैशाळ, बेडगकडून सांगली व कोल्हापूरकडे येणाऱ्या वाहनांसाठी जुना नाका–शास्त्री चौक–फुले चौक हा मार्ग देण्यात आला आहे. एमआयडीसी, मिरज येथून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांना मेनन पिस्टन चौक–तानंग फाटा–सुभाषनगर मार्गे जावे लागेल.
पार्किंगची व्यवस्था
वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर व सांगलीकडून येणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मालगावकडून येणाऱ्यांसाठी न्यू इंग्लिश स्कूल, आरग–बेडगकडून येणाऱ्यांसाठी मिरज हायस्कूल, म्हैशाळ व कर्नाटककडून येणाऱ्यांसाठी महात्मा फुले चौक, तसेच गर्दी झाल्यास साठे पुतळ्याच्या मागील पटांगण पर्यायी पार्किंग म्हणून वापरण्यात येणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे. विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.