कागल : गोरंबे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी डॉल्बी मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. याआधीच्या दोन वर्षांत गावातील सहा मंडळांवर डॉल्बीमुळे ध्वनीप्रदूषणाचे खटले दाखल झाले होते. त्यामुळे यावर्षी पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मंडळांना मार्गदर्शन करून पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व पटवून दिले.
कागल पोलीस ठाण्याचे गजेंद्र लोहार, गाव सरपंच मालुबाई सुतार, दत्ता दंडवते, निशिकांत कांबळे, दिलीप सावंत, दत्ता पाटील, अमर सुतार, ऋषी ढोले, पोलीस पाटील रुपाली गायकवाड यांनी मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांशी संवाद साधून डॉल्बी न वापरण्याचे आवाहन केले. या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व १३ मंडळांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमात विशेष योगदान दिल्याबद्दल गावातील सूरज प्रकाश पाटील, चंद्रकांत सखाराम पाटील, रणजित हिंदुराव पिष्टे व रोहित रखोजी शिंत्रे यांचा कागल पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.
गोरंबे गावाच्या या उपक्रमाचे कोल्हापूर जिल्हा पोलीस व कागल पोलिसांनी कौतुक केले असून, इतर गावांनीही यापासून प्रेरणा घेऊन डॉल्बी मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
