
गोकुळ शिरगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल १,२९,५०० किंमतीच्या ७ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. फिर्यादी अजित मधुकर काटे (रा. तामगाव, ता. करवीर) यांची स्प्लेंडर प्लस चोरीला गेल्याने गुन्हा दाखल झाला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी मलेशा रावसाहेब येळगुडे (वय २४, रा. गोकुळ शिरगाव, मुळ रा. नाइंग्लज, जि. बेळगाव, कर्नाटक) याला पकडले. चौकशीत त्याने इतर ६ चोरीच्या गाड्या कबूल केल्या.
या कारवाईत पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धिरजकुमार बच्चु, उपविभागीय अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मगदुम व गुन्हे शोध पथकाने सहभाग घेतला. या कामगिरीमुळे गोकुळ शिरगाव व कागल पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.