
कागल : एस.टी. स्टँड परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असताना एका महिलेचा नागरिकांनी पाठलाग करून तिला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही महिला पुजा अमर दंडवते (वय २५, रा. संभाजीनगर, निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी असून तिच्या ताब्यातून तुटलेले सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास कागल एस.टी. स्टँड जवळ ही घटना घडली. मणीमंगळसुत्राचे अंदाजे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (४ ग्रॅम वजन) जप्त करण्यात आले असून त्याबाबत संशयित आरोपी महिला कोणताही मालकी हक्काचा पुरावा सादर करू शकली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई शालिनी नवलसिंग मावळे पोलीस अंमलदार यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस करीत आहेत.
