
सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडील इंटरॅक्टिव पॅनेल खरेदी प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाले नसल्याचा खुलासा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केला आहे. अलीकडेच काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते. यावर शिक्षण विभागाने दिलेल्या निवेदनात ही खरेदी पूर्णपणे शासन नियमावलीनुसार व GeM पोर्टलच्या अटी-शर्तींचे पालन करून करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
गायकवाड यांनी सांगितले की, या खरेदीत बालभारती व एससीआरटी मान्यता प्राप्त सॉफ्टवेअरच वापरण्यात आले असून, तांत्रिक छाननी, दर्जा तपासणी व पारदर्शक निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. दरांबाबतही कोणतीही अनियमितता नसून, अन्य शासकीय विभागांच्या तुलनेत योग्य किंमतीतच खरेदी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळावा हा या खरेदीमागचा एकमेव हेतू असून, आरोप तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आहेत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.