
आरग (ता. मिरज) येथे २१ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, दोन अल्पवयीन मित्रांनीच सुजल बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग) याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
प्रविण तानाजी निकम यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी दाखल केला आहे. फिर्यादी हे मयत सुजल पाटील यांचे मामा असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी सुजलला त्याचा अल्पवयीन मित्र बोलावून घेऊन गेला होता. त्यानंतर सुजल घरी परतलाच नाही, त्यामुळे २९ जून रोजी त्याच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तपास करताना अल्पवयीन मित्रांकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक बाब समोर आली. २८ जून रोजी सुजल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र बेळंकी येथे हळदी समारंभासाठी गेले होते. तेथे दारू सेवन केल्यानंतर परत आरगकडे येताना आरग येथील शेटाप्पा मंदिराजवळील तलावाजवळ त्यांनी सुजलची चेष्टा-मस्करी केली. त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याच्याशी झोंबाझोंबी करत समलैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. सुजलने त्याचा तीव्र विरोध केला आणि शिवीगाळ केली, त्यामुळे संतप्त होऊन दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यानंतर तलावाच्या पाण्यात बुडवून त्याचा खून केला.
पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तलावात शोध घेतला असता सुजलचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत पाण्यात सापडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या दोन्ही अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.