
कोल्हापूर, दि. ३० – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ‘शक्तिपीठ महामार्गा’च्या विरोधात इंडीया आघाडी, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना व इतर विविध संघटनांच्या वतीने १ जुलै रोजी महामार्ग रोको आणि चक्का जाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक नियमन जाहीर केले आहे.
हे आदेश आंदोलन सुरू होणाऱ्या १ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून लागू होतील आणि आंदोलन संपेपर्यंत प्रभावी राहतील. आंदोलनामुळे पुणे व बेळगावकडे जाणाऱ्या तसेच सांगलीकडे जाणाऱ्या जड व हलक्या वाहनांना काही प्रमुख मार्गांवर प्रवेश बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्गांची सूचना देण्यात आली आहे.
काही महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे:
कागल, लक्ष्मी टेकडी ते पुणे मार्गावरून जाणारी वाहने – लक्ष्मी टेकडी येथे थांबवून फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी, इचलकरंजी मार्गे वळवण्यात येणार.
उजळाईवाडी ओव्हरब्रिजखालून पुणेकडे जाणारी वाहने – शाहु टोलनाका, ताराराणी चौक, शिये फाटा मार्गे वळवण्यात येतील.
वाठार ब्रिज (शेर-ए-पंजाब) येथे सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना – वडगांव, हातकणंगले मार्गे वळवण्यात येणार.
तावडे हॉटेल, सांगली फाटा परिसरातून ये-जा करणारी वाहने – पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, ताराराणी चौक, कसबा बावडा आदी मार्गे वळवण्यात येणार.
हातकणंगले, सांगलीमार्गे पुणे किंवा कागलकडे जाणारी वाहने – इचलकरंजी फाटा, कबनूर, वडगाव, वाठार ब्रिज आदी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश.
पोलीस प्रशासनाने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक वाहतूक, वैद्यकीय आपत्ती किंवा इतर अत्यावश्यक सेवांकरिता विशेष दक्षता घेतली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक शाखेने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.