
सांगली, दि. १ जुलै : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य जयश्रीताई पाटील यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रलंबित विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.
सांगली मिरज कुपवाड शहरातील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याचे जयश्रीताई पाटील यांनी नमूद केले आहे.
त्यांनी निवेदनाद्वारे खालील प्रमुख ८ मागण्या केल्या आहेत:
१. एसटीपी प्रकल्पासाठी निधी – सांगली शहरातील शेरिनाला आणि सांगलीवाडी येथे प्रलंबित असलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी मंजूर करावा.
२. वारणा उद्भव योजना – शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी ही योजना तातडीने मंजूर करून निधी उपलब्ध करावा.
३. ड्रेनेजमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी निधी – सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी आवश्यक आहे.
४. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी – महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी.
५. जुनी व खराब पाईपलाईन बदलणे – ३० वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने ती बदलावी आणि विस्तारित भागातील ड्रेनेज लाइन टाकावी.
६. रिंग रोडचा विकास – महापालिका स्थापनेनंतरही रिंगरोड विकसित न झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण असून, त्यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता आहे.
७. सांगलीसाठी विमानतळ – सांगली शहरालगत स्वतंत्र विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
८. ग्रामीण भागातील ड्रेनेज योजना – सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरी वस्ती असलेल्या ग्रामीण भागांमध्ये मलनिस्सारण व्यवस्था मंजूर करावी.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्या सांगलीतील स्टेशन चौक येथे सुरू असलेल्या स्मारकासाठी लागणाऱ्या निधीचीही मागणी केली आहे. स्मारकाचे काम अंतिम टप्यात असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयश्रीताई पाटील यांनी सांगितले की, या सर्व मागण्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून, त्याच्या अंमलबजावणीमुळे शहराचा सर्वांगीण विकास शक्य होईल. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी या प्रस्तावांवर सकारात्मक भूमिका घ्यावी व विशेष निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे (सावकर), प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.