
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करण्याच्या ठरावाला महाडिक गटाने वार्षिक सर्वसाधारण सभेत व संचालक मंडळ बैठकीत उघड विरोध दर्शवला असला तरी, सत्तारूढ गटाच्या बहुमतामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला. नवी पोटनियम दुरुस्ती लागू झाल्यास सर्वसाधारण गटाच्या जागा 16 वरून 20 व राखीव जागा 5 इतक्या होऊन संचालकांची संख्या 25 होणार आहे. मात्र, महाडिक गटाच्या विरोधामुळे शासनाकडून या ठरावाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया कठीण होण्याची शक्यता आहे.
महाडिक गटाचा आरोप आहे की, “जंबो” संचालक मंडळ करून ना. हसन मुश्रीफ हे महायुतीतील तसेच आ. सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच या गटाने विरोधाचा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या सहकार खात्याची मंजुरी 60 दिवसांत घेणे बंधनकारक असून, याच मंजुरीवर पुढील घडामोडी ठरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोकुळसंदर्भातील भूमिका यापूर्वीही महाडिक गटाच्या बाजूने राहिल्याने, राज्य पातळीवर महायुतीचे नेते यावर काय निर्णय घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.