
कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे पालन यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत परवान्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रिक्षात बसविणाऱ्या २१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख १० हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
याशिवाय ९ व १० सप्टेंबर रोजी शहरात मोटरसायकलवर तिब्बल सिट फिरणाऱ्या ११० वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ लाख १० हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
वाहतूक शाखेकडून शालेय मुलांची ने-आण करणाऱ्या सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून धोकादायक वाहतूक टाळावी आणि विद्यार्थ्यांच्या बॅगा रिक्षा बाहेर लोंबकळणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच तिब्बल सिट वाहनचालकांवरही अशीच मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी केली.

