
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आणि पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पारंपरिकरित्या ‘राजकारणाची प्राथमिक शाळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, नेत्यांच्या घरांमध्ये आता संधी कोणाला द्यायची यावर खल सुरू झाला आहे.
जिल्ह्यात नव्याने नगरपालिका व नगरपंचायती स्थापन झाल्याने मतदारसंघांची पुनर्रचना पूर्ण झाली असून, जिल्हा परिषदेचे एकूण ६८ मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचे व सभापतिपदांचे आरक्षण जाहीर होताच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काही तालुक्यांमध्ये अडचणी असल्या तरी नेत्यांनी आपापल्या गोटात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपकडून माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव पुन्हा पुढे येऊ शकते, तसेच प्रा. अनिता चौगुले, विद्यादेवी नाथाजी पाटील, सुयेशा अंबरिषसिंह घाटगे यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातून जिल्हाध्यक्ष शीलत फराकटे, राजेश पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, के. पी. पाटील, माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या घरातील महिलांसह माजी सदस्या सुजाता पाटील यांच्या नावांचीही चर्चा होत आहे.