
कोल्हापूर : आत्मनिर्भर भारताचे स्वप्न घेऊन अहोरात्र कष्ट करणारे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ७५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संकल्प केल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले. या कापडी पिशव्यांचे अनावरण मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कापडी पिशवीमध्ये भारताच्या संविधान प्रस्ताविकेची प्रत, भारताचा तिरंगा झेंडा, आत्मनिर्भर भारताचा संदेश देणारे स्टिकर आणि पत्राचा समावेश असून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरात या पिशव्यांचे वितरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार अमल महाडिक यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अनुकरणीय आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण प्रसंगी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरोघरी कापडी पिशवी वाटपाचा हा उपक्रम अभिनव म्हणावा लागेल.