
कागल (प्रतिनिधी) :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून ग्रामीणपातळीवर गावचा शाश्वत विकास होण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोठ्या व व्यापक स्वरुपात महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये रावबण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ आज दिनांक १७.९.२०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याबाबत दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेतील सुचनेनुसार कागल तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आज दिनांक १७.९.२०२५ रोजी कागल तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या. या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. गावाच्या विकासात प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग व बांधिलकी महत्त्वाची असून त्यासाठी या अभियानातून व्यापक जनजागृती घडवून आणली जाणार आहे. तसेच पिंपळगाव बु. येथील ग्रामसभेला गटविकास अधिकारी श्री कुलदीप बोंगे यांनी स्वत: उपस्थित राहून मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाबाबत प्रबोधन केले.

ग्रामसभांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाचे उद्दिष्ट , राबविण्यात येणारे विविध उपक्रम व ग्रामविकासाच्या दृष्टीने करावयाच्या कृती यावर सविस्तर चर्चा झाली. मा.सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचातय अधिकारी व ग्रामस्थ यांनी या अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये विकास घडेल व यातून मिळणाऱ्या बक्षीस रकमेचा उपयोग अधिक चांगल्या व आवश्यक गोष्टीसाठी करता येईल अशाप्रकारचे मत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या अभियानामध्ये प्रामुख्याने सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध्द, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. या घटकांवर भर दिला जाणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी ग्रामपंचायत स्तरावर याचे नियोजन तयार करून या अभियानाची सुरुवात आज दिनांक १७.९.२०२५ पासुन केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने सक्रिय सहभाग घेत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असून. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीं या अभियानात सहभागी होऊन चांगल्या प्रकारचे कामकाज करतील व तालुका राज्यात आदर्श म्हणून नावारूपास येईल, तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती तसेच पंचायत समितीही बक्षीस योजनेस पात्र ठरतील असा विश्वास गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केला.