कोल्हापूर - महापालिका प्रशासन आणि जिल्ह्यात ग्रामीण पातळीवरील स्थानिक प्रशासन प्रदुषणाचे कारण पुढे करून अनेक ठिकाणी श्री गणेशमूर्ती दान म्हणून घेतात; मात्र अनेक ठिकाणी या मूर्ती पुढे विसर्जित केल्या जात नाहीत. अशाच प्रकारे शहरातील कळंबा तलाव येथे दान घेतलेल्या मात्र विसर्जित न केलेल्या मूर्ती हिंदुत्वनिष्ठांनी पुढाकार घेऊन परत विसर्जित केल्या. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि महेंद्र अहिरे, तसेच यादव महाराज यांचा समावेश होता.
या संदर्भात संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या धार्मिक परंपरांना छेद देत अकारण जलप्रदूषणाचा बाऊ करत अनेक ठिकाणी गणेशोत्सव कालावधी श्री गणेशमूर्ती दान म्हणून घेतल्या जातात; मात्र अनेक ठिकाणी गणेशोत्सव संपल्यावर १०-१२ दिवसांनंतरही या मूर्ती उघड्यावर असलेल्या आढळून येतात. हा प्रकार भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन रंकाळा तलाव परिसरातील, तसेच कागल तालुक्यातील दूधगंगा नदीच्या परिसरातील याचप्रकारे बाहेर आलेल्या श्री गशेणमूर्ती परत नदीत विसर्जित केल्या. तरी या पुढील काळात तरी यातून प्रशासनाने धडा घेऊन हिंदु धर्म-परंपरा यांच्या विरोधात असलेल्या मूर्तीदानासारख्या कृती राबवू नयेत.''