
गोकुळशिरगाव : उजळाईवाडी परिसरात १८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाला केक आणायला गेलेल्या अनिकेत काटे (रा. रेणुका कॉलनी) या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून आरोपी अक्षय पाटील, रोहन पाटील आणि सहा अनोळखी इसमांनी एकत्रित येऊन अनिकेत काटे याच्यावर तलवारीने वार केला. त्याच्या मानेला आणि उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. आरोपींनी बेकरीतील काचा फोडून शटर बंद केले तसेच प्रतिक ऊर्फ बंडया केसरकर यांच्या घरात घुसून त्याच्या आईला तलवारीने धाक दाखवत पाण्याचे बॅरेल फोडून दहशत माजवली. याप्रकरणी गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.