
कागल : पुणे-बेंगलोर हायवेवर महिलेला लुटल्याची घटना घडली आहे. कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. निर्मला इंद्रजीत संपकाळ (रा. गहनीनाथ नगर, कागल) या महिलेला २१ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता हायवेवरील शासकीय नर्सरी कमानीजवळ काळ्या स्प्लेंडरवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गळ्यातील मणीमंगळसुत्र हिसकावून जबरी चोरी केली. या घटनेत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटला गेला आहे. फिर्यादी आपल्या मैत्रिणीसोबत अॅक्टीवावरून घरी जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कागल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.