कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; मंत्रिमंडळ बैठकीत मिळाली मंजुरी

Share News

कोल्हापूर : क्रीडा पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून क्रिकेट प्रेमींमधून होत होती. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने केलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी एकत्रित प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन क्रीडा मंत्र्यांकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. कोल्हापूर शहरालगत असलेल्या विकासवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ४२१ हेक्टर जागेपैकी १२ हेक्टर जमिनीची मागणी क्रिकेट स्टेडियम उभारणीकरता करण्यात आली होती.
या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम झाल्यास कोल्हापूरसह सांगली, सातारा,सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख ठळक बनणार आहे. ही बाब ध्यानात घेऊन लवकरात लवकर या बाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील औद्योगिक महामंडळाच्या मालकीची बारा हेक्टर जमीन क्रिकेट स्टेडियम साठी संपादित करण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार. नियोजित स्टेडियम हे माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार असल्याचा विशेष आनंद आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला चालना मिळेल.
-आमदार अमल महाडिक
कोल्हापूर दक्षिण विधानसभा

यापूर्वी 80 च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता. या सामन्यानंतर पुन्हा एकदा तब्बल चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर लवकरच कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने बघण्याची संधी प्राप्त झाली आहे.
नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया लवकरच होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर पडेल असा विश्वास आमदार महाडिक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!