
मुंबई : राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी दिलासादायक बातमी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँड (E-Bond) प्रणाली सुरू झाली आहे. यामुळे कागदी बाँडची झंझट संपून सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागासह NeSL आणि NIC यांच्या तांत्रिक सहाय्याने या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. आयात-निर्यात व्यवहारांसाठी वेगवेगळ्या कागदी बाँडची गरज राहणार नाही; एकाच ई-बाँडद्वारे प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस यासह सर्व व्यवहार करता येतील.
ई-बाँड ICEGATE पोर्टलवर तयार होईल, NeSL च्या माध्यमातून ई-स्टॅम्पिंग आणि ई-स्वाक्षरी केली जाईल, तर कस्टम अधिकारी ऑनलाईन पडताळणी करतील. ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरण्याची सोय असल्यामुळे कागदी स्टॅम्पची आवश्यकता संपेल. हा उपक्रम सीमाशुल्क प्रक्रिया गतिमान, व्यवसाय सुलभ, पारदर्शक आणि पर्यावरणपूरक बनवणार आहे.