
हातकणंगले : हुपरीतील चांदी व्यावसायिक मेघराज शेटके यांची फसवणूक करून ५ लाखांहून अधिक किंमतीची चांदी घेऊन फरार झालेला आरोपी अरुणकुमार राकेशकुमार भारद्वाज (रा. उत्तर प्रदेश) यास पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राऊ येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख किंमतीची ३ किलो ४० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रकाश मांडवकर, युवराज कांबळे आणि एकनाथ भांगरे यांनी सहभाग घेतला. आरोपीला हुपरी येथे आणून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. ही कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेशकूमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे,पोलिस उप निरीक्षक प्रसाद कोळपे यांनी केली.