
कागल : कागल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या न्यू राधाकृष्ण मंगल कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. समाजातील विवाह, स्नेहमेळावे, सत्कार समारंभ, विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम यांना नवे आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी हे मंगल कार्यालय उपयुक्त ठरणार आहे.
हा उद्घाटन समारंभ स्वप्निल गोरंबेकर व साहिल गोरंबेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले की, “न्यू राधाकृष्ण मंगल कार्यालय हे केवळ एक वास्तू नसून कागल तालुक्याच्या सामाजिक-सांस्कृतिक गरजांची पूर्तता करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.”
जिल्हाध्यक्ष कांबळे दादा यांनी गोरंबेकर बंधूंच्या उपक्रमाचे कौतुक करत मंगल कार्यालयामुळे ग्रामीण भागातील लोकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
यावेळी विविध मान्यवर, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच गोरंबेकर कुटुंबीयांचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी परिसरात उत्साहाचे वातावरण होते.