
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली निवडणूक रणनीती निश्चित केली आहे. महायुतीकडून प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून, या समितीत पालकमंत्री, प्रमुख पक्षांचे जिल्हा नेते आणि आमदारांचा समावेश असेल. या समित्या पुढील आठ दिवसांत जिल्हानिहाय निवडणुकीची सद्यस्थिती, महायुतीतील ताकद आणि अंतर्गत वादांचा सविस्तर अहवाल तयार करून राज्य समितीकडे सादर करणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये मतभेद असतील, त्यावर अंतिम निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण प्रक्रियेवरील राज्य सरकारचे २० ऑगस्ट २०२५ रोजीचे सुधारित नियम सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. न्यायालयाने महाराष्ट्रातील आरक्षण प्रक्रिया चक्राकार पद्धतीने सुरू ठेवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील याचिका २५ सप्टेंबर रोजी फेटाळण्यात आल्या आहेत.
निवडणुकांच्या तारखांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात नगरपरिषद निवडणुका नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात, तर जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारयंत्रणा सज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे.