
विटा – नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज सकाळी ११ वाजता पालिकेच्या अल्पबचत सभागृहात पार पडली. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार घेण्यात आलेल्या या सोडतीत एकूण २६ सदस्य पदांपैकी ११ जागा अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) उमेदवारांसाठी राखीव ठरल्या असून, उर्वरित १५ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्या आहेत.
विशेष म्हणजे या २६ पैकी तब्बल १३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात एससी महिला, एसटी महिला, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला या चार गटांसाठी स्वतंत्र चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तर नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. या सोडतीवर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार विटा नगरपरिषदेची लोकसंख्या ४८ हजार २८९ असून, सुधारित प्रभाग रचनेनुसार एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या रचनेनुसार एकूण १३ प्रभागांमधून २७ नगरसेवकांची निवड होणार आहे.
विट्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या ६ हजार ६२८ असून, अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ४०२ इतकी आहे. त्यानुसार ४ नगरसेवक एससी प्रवर्गातून (त्यापैकी २ महिला), तर ७ नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून (त्यापैकी ४ महिला) असतील. सर्वसाधारण प्रवर्गातील ८ नगरसेवक ठरले असून, एकूण १३ नगरसेविका महिला असणार आहेत. एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ३ हजार ७१५ इतकी राहते.
दरम्यान, आगामी निवडणुकीत विटा नगरपरिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे दिसत असून, आरक्षण सोडतीनंतर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.