
सप्तरंगांनी पालटले यशवंत किल्ल्यातील कुस्ती मैदानाचे रूपडे
कागल : कागलमध्ये ऑलिंपिक क्रीडास्पर्धांच्या धर्तीवरील कुस्ती मैदान ही कागल शहराची शान आहे, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानासारखीच या मैदानाची रचना झाली आहे, असेही ते म्हणाले.
यशवंत किल्ला परीसरातील कुस्ती मैदान नूतनीकरण कामाचे मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण झाले. श्री गहिनीनाथ गैबीपीर उरसानिमित्त सप्तरंगानी या मैदानाचे रुपडे पालटले आहे. ऑलिंपिकच्या धर्तीवर कुस्ती मैदान सजविले आहे तसेच; सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टही उभारले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कागलमध्ये गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसानिमित्त दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. या मैदानात देशातील नामवंत मल्ल सहभागी होतात. कागल शहरासह पंचक्रोशीतूनही कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. मंत्री मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार कागल नगरपालिकेने यशवंत किल्ला परिसरातील कुस्ती संकुलाचे नूतनीकरण केले आहे.
या कुस्ती संकुलात नवीन मातीसह गोलाकार सिमेंट काँक्रीटच्या २५० फूट लांबीच्या सात पायरी टप्प्यांची डागडुजी व त्याला सप्तरंगी रंगरंगोटी केली आहे. या संकुलातच इनडोअर बॅडमिंटन कोर्टचीही दुरुस्ती केली आहे. हे सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट आहे. त्यामुळे यशवंत किल्ला परिसर आता कुस्ती प्रेमींसह बॅडमिंटन प्रेमींसाठीही आकर्षण केंद्र ठरले आहे.