
कागल : समर्थ कॉलनी, श्रमिक सोसायटी येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रदीप मोतिराम पाटील (वय ३५, व्यवसाय नोकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १८ डिसेंबर रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या बंद घराचे गेटचे कुलूप तोडून, समोरील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटत घरात प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरी व लॉकर फोडून सोन्याची अंगठी, गंठण, टॉप्स, सोन्याचे नाणे, चांदीचे पैंजण तसेच १५ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणाचा तपास कागल पोलीस करीत असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षिरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.