छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे ‘स्मारक’ व ‘टेक्स्टाईल टुरिझम हब’ ला तत्वत: मान्यता;

Share News

वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांचा मंत्रालयीन बैठकीत निर्णय

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आधुनिक कोल्हापूरचे जनक जनक आहेत. त्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरवासीयांची अस्मिता असलेली छत्रपती शाहू मिल्स काळाच्या ओघात बंद पडली. या गिरणीच्या स्थापनेमागे राजर्षी शाहू महाराजांचे अनेक दूरदृष्टीचे आणि कल्याणकारी उद्देश होते. कोल्हापूरला केवळ शेतीवर अवलंबून न ठेवता औद्योगिकीकरणाची सुरुवात करणे. सामान्य नागरिकांना आणि गरीब जनतेला दर्जेदार कापड माफक दरात उपलब्ध करून देणे. संस्थानातील जनतेने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि व्यापार-उद्योगात प्रगती करावी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या मिल्सला स्वत:ची जागा व आर्थिक पाठबळ देवून चालना दिली. अशा या पवित्र जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करणेबाबत वस्त्रोद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, को.म.न.पा. आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी, छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व राजर्षी शाहू महाराजांच्या नावे “टेक्स्टाईल टुरिझम हब” ला तत्वत: मान्यता दिली. वस्त्रोद्योग विभागाला २६ पैकी ५ एकर जागा घेवून त्यामध्ये अर्बन हट हि संकल्पना राबविली जाईल. याद्वारे कोल्हापुरातील स्थानिक हस्तकला उदा. कोल्हापुरी चप्पल, साज, कापड उद्योग यांना एकाच छताखाली जागतिक स्तरावर नेणे. यासह राज्यातील विविध ठिकाणी निर्माण होणाऱ्या कापडास बाजापेठ उपलब्ध केली जाईल. यासह याठिकाणी प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करून वस्त्रोद्योग वाढीस आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील. उर्वरित २१ एकर जागेचा महानगरपालिकेने आराखडा तयार करावा व त्यासाठी प्रशासनाने निधी खर्च करावा, असा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री यांनी दिला.

तसेच सदर २१ एकर जागेत केल्या जाणाऱ्या प्रयोजनांचा आराखडा करण्यासाठी एजन्सी नेमण्याचे आदेश दिले. यासह मिलमधील “चिमणी” कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीची आणि वैभवशाली इतिहासाची एक महत्त्वाची खूण आहे. चिमणीला कोणताही धक्का न लावता तिचे मूळ स्वरूप जपून संवर्धन करण्याचे निर्देश दिले. मिल्समधील कामगार संघटनेच्या घरकुलासाठी २००० मीटर जागा देण्याच्या सूचना दिल्या.

या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, स्थानिक पातळीवर प्रकल्पाचा खर्च करण्यास मर्यादा असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत संयुक्तिक बैठक घेवून नगरविकास विभागाच्या वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत हि मिल टेक्स्टाईल टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी, राजर्षी शाहू महाराजांच्या या कार्यामुळेच कोल्हापूर हे आजही ‘रयतेची आणि शाहू महाराजांच्या विचारांची राजधानी‘ म्हणून ओळखले जाते. महाराजांनी ज्या उद्देशाने या मिल्सची स्थापना केली तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची, विचारांची प्रेरणा देणारे आणि व्यापार, उद्योगाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे स्मारक कोल्हापूरवासियांना अपेक्षित आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि करवीरसंस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इस्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट महोत्सवांसाठी अत्याधुनिक १००० ते १२०० आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, मिल्स शेजारी असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अॅम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करावा. जेणेकरून या स्मारकाद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, उद्योग, कला क्षेत्राच्या उन्नतीसाठी असलेला उद्देश जपला जाईल, अशी मागणी केली.

आमदार अमल महाडिक यांनी, केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून हि जागा विकसित करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी पत्रव्यवहार सुरु असून मार्च नंतर पुन्हा एक बैठक आयोजित करू. त्याचा आढावा घेवूया, अशी मागणी केली.

 या बैठकीस प्रधान सचिव अनुष्का सिन्हा, नगर विकास विभागाच्या सुशीला पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण पवार, उपसचिव तुषार पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे आयुक्त संजय दैने, सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव रामदास कोळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!