
मुंबई : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच. त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित असून, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत अधिवेशनानंतर पहिल्याच आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक घेवून आय.टी.पार्क निर्मितीसाठी सुमारे २०० एकर जागा वितरीत करण्यात येईल का, असा प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. कोल्हापूरच्या आय.टी.पार्क आणि हद्दवाढीसंदर्भात आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, भारताला २०४७ पर्यंत जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. यासाठी केंद्र शासनाने नीती आयोग व राज्य शासनाने मित्र संस्थेची स्थापना केली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली. यामध्ये फौंड्री, वस्त्रोद्योग, कृषि, आय.टी., पर्यटन या पाच क्षेत्रांचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धोरणात्मक योजना आखलेल्या आहेत. यासह महा स्ट्राइड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवतानाच आयटी क्षेत्राशी संलग्न असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. या डेटा सेंटर सोबतच आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास आयटी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल. कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क येथे आरोग्य व कृषि विभागाच्या जागा आय.टी.सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मा.मुख्यमंत्री महोदयांकडे असलेल्या आय.टी. निर्मितीसाठी जागा वितरीत करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक घेवून, आय.टी. क्षेत्र निर्मितीसाठी २०० एकर जागा वितरीत करण्यात येईल काय? असा प्रश्न उपस्थित केला. यासह गेले ८२ वर्षे शहराची हद्दवाढ झाली नसल्याने आय.टी.सह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी जागा मिळत नाही त्यामुळे हद्दवाढ करण्यात येईल काय, असाही प्रश्न उपस्थित केला.
याबाबत उत्तर देताना उद्योग राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांनी आय.टी. पार्क साठी शेंडा पार्क येथे मागणी केलेल्या जमिनी बाबत उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दि.०४.१०.२०२३ व दि.०१.०४.२०२५ रोजी बैठक घेवून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निर्देश दिले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे ३४.७६ हेक्टर जमीन मागणी केली आहे. ही जमीन कृषि विद्यापीठाची असून, कृषि विद्यापीठाने या जागेच्या बदल्यात इतरत्र जागा देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सदर विभागास जिल्ह्यातील तीन ते चार तालुक्यातील जागा दाखविण्यात आल्या आहेत. त्यातील मौजे सांगरूळ, ता.करवीर येथील गट नं.२०२१/१ ही सुमारे ३९ हेक्टर जागा त्यांना पसंत आहे. सदर जागा वन विभागाची असल्याने ती निरवनीकरण करणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्योग विभागामार्फत पाठवून ही जागा देण्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची मागणी पुन्हा केली. यावर तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी कोल्हापुरात आय.टी.पार्क निर्मितीसाठी बैठक घेण्याचे निर्देश मंत्री महोदयांना दिले. यावर बैठक घेण्याची ग्वाही मंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी दिली.