
कागल (जि. कोल्हापूर) | स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये कागल शहराने देशभरात १२ वा व महाराष्ट्रात गौरवास्पद २ रा क्रमांक पटकावून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. २०,००० ते ५०,००० लोकसंख्या गटातील १५८५ शहरांमध्ये कागलने आपले स्थान पक्के केले असून, मागील वर्षीचा ११० वा क्रमांक थेट १२ वर झेपावला आहे.
स्वच्छतेसंबंधी घराघरातील कचरा संकलन, प्रक्रिया व व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जलखोत व शौचालयांची स्थिती, तक्रारी निवारण, रस्ते स्वच्छता आदी विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कागल शहराला सलग तिसऱ्यांदा ३-स्टार ‘कचरा मुक्त शहर’ मानांकन आणि ODF++ दर्जा मिळाला आहे.
या यशाचे श्रेय वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ यांच्या प्रभावी मार्गदर्शनासह, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील कागल नगरपरिषदेच्या संपूर्ण यंत्रणेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आहे. नोडल अधिकारी नितीन कांबळे, समन्वय अधिकारी आशिय शिंगण, मुकादम बादल कांबळे, कौतिक कांबळे यांचेही विशेष योगदान लाभले.
महिला बचत गट, सामाजिक संस्था, पर्यावरण कार्यकर्ते, व्यावसायिक, विद्यार्थी, पत्रकार आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त सहकार्याने हे घवघवीत यश प्राप्त झाले. या कामगिरीने कागल शहर देशपातळीवर स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरले आहे.