
सांगली : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात भेट देऊन उद्योजक संवाद मेळाव्यात परिसरातील उद्योजक व कंपनी प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. गुन्हेगारी वाढ, ड्रग्जचा प्रसार आणि सुरक्षेच्या इतर समस्यांवर उघडपणे चर्चा करत त्यांनी पोलीस प्रशासनासह उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर दिला.
या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी ड्रग्ज नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेने निर्माण केलेल्या धाकाचा उल्लेख केला. युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रतिज्ञा आणि पोलीस काका, पोलीस दीदी या उपक्रमांमुळे रॅगिंगच्या घटनांमध्ये घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात तंटामुक्ती समित्या नेमण्याची सूचना केली, ज्यामध्ये निवृत्त पोलीस, पोलीस पाटील यांचा समावेश असेल.
कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिस पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, डार्क स्पॉट्सवर लाईट आणि सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना देऊन परिसराच्या सुरक्षेचा दर्जा उंचावण्याचा निर्णय घेतला. खंडणी टोळ्या, चोरीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः कचरा गोळा करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी यावर जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्योजकांच्या मागणीनुसार परिसरात वाहनतळ विकसित करण्याचा विचार असून, सर्व कर्मचाऱ्यांचे KYC पूर्ण करूनच त्यांची नियुक्ती करावी, तसेच पोलीस ठाण्यातून मिळणारे ओळख प्रमाणपत्र मिळेपर्यंत कोणताही नवीन कर्मचारी नेमू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. फिरते पोलीस स्टेशन सुरू करण्याची घोषणा करत त्यांनी पोलिसांची उपस्थिती अधिक गतिशील आणि सहज उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.
या संवाद बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे उपस्थित होते. भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, युवा मोर्चा सरचिटणीस प्रकाश पाटील, व्यापारी संघटना अध्यक्ष बिरु आस्की, माजी अध्यक्ष अमर दिडवळ, उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे, निलेश चौगुले, अमोल कदम यांच्यासह नागरिक व उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.