
सांगली : जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिस्तीची मोहोर उमटवली आहे. मंगळवारी तब्बल २५ उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलाच दणका दिला. सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
मंगळवारी सकाळी पावणे दहापर्यंत स्वतः कार्यालयात हजर राहून सीईओंनी हजेरी तपासली. त्यानंतर दहा वाजताच प्रवेशद्वार कुलूपबंद करण्यात आले. त्यामुळे उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांची बाहेरच गर्दी झाली. उद्यापासून वेळेत येतो, पण आता आत सोडा, अशी आर्जवे कर्मचाऱ्यांकडून सुरू झाली. यावेळी सव्वा दहाच्या सुमारास सीईओ नरवाडे स्वतः प्रवेशद्वारावर दाखल झाले आणि संबंधितांना चांगलेच सुनावले.
खातेप्रमुख असो अथवा कर्मचारी, सर्वांनी वेळेत कार्यालयात हजर झालेच पाहिजे. पहिला दिवस असल्याने समज देतो, मात्र उद्यापासून जर शिस्त मोडली तर कारवाई टाळता येणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला.
सीईओंच्या या पावलामुळे झेडपीत दिवसभर चर्चा रंगली. उद्यापासून नक्की साडेनऊलाच हजर राहायचं, असे कर्मचारी एकमेकांना बजावताना दिसले. तर काही खातेप्रमुखांमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चाही सुरू होती.
जिल्हा परिषदेत नियमित व कंत्राटी मिळून ३९७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी मंगळवारी २५ जण उशिरा आले. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ हा अधिकृत कार्यालयीन वेळ असून अनेक कर्मचारी अकरा वाजेपर्यंत हजर नसतात. काही महिन्यांपूर्वी कारवाई होऊनही उशिरा येण्याची हीच परंपरा पुन्हा सुरू झाली आहे.
सीईओ नरवाडे यांच्या सक्त कारवाईच्या इशाऱ्यामुळे आता झेडपी कर्मचाऱ्यांची शिस्त कस लागणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
