
कागल : कसबा सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील कुख्यात गुन्हेगार विनायक शिवाजी आवळे यास कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. कागल व मुरगूड पोलीस ठाण्यांत त्याच्याविरोधात एकूण चार गंभीर गुन्हे दाखल असून, तो कोणताही रास्त व्यवसाय न करता गुन्हेगारी कृत्यांमधून परिसरात दहशत निर्माण करत असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
आवळेच्या सततच्या आक्रमक हालचालींमुळे परिसरातील नागरिक दहशतीत जगत होते. त्याच्या धमक्यांमुळे कोणीही उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळेच पोलिसांनी तयार केलेला हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, राधानगरी कागल उपविभाग, कोल्हापूर यांनी मान्य करून आवळे यास दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धिरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शन होते. आदेशान्वये कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे यांनी ही कारवाई केली.
संबंधित आरोपीविरुद्ध कोणाचीही तक्रार असल्यास नागरिकांनी निसंकोचपणे कागल पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.