
सांगली – भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) सातारा डिव्हिजनतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली येथील सुरज फाउंडेशन नवकृष्णा व्हॅली स्कूलला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्कूल बस भेट प्रदान करण्यात आली.
हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी एलआयसीचे सीनियर डिव्हिजनल मॅनेजर मा. रमेश राठोडकर म्हणाले, “एलआयसीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकूण ९५१ सामाजिक उपक्रम राबवले असून यासाठी २३३ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे. शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रंथालय, कॉम्प्युटर, हॉस्टेल, रुग्णालय, कॅन्सर व सर्जरीसारख्या आरोग्य सुधारणा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी बस देण्याची योजना ही त्याचाच भाग आहे.”
मार्केटिंग ऑफिसर श्री. मिलींद बस्की यांनी सांगितले की, “या स्कूल बसच्या मदतीने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल.”
संस्थेचे मुख्य ट्रस्टी मा. प्रवीण लुंकड व डायरेक्टर संगीता पागनीस यांनी एलआयसीचे मनःपूर्वक आभार मानले. “ही बस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल,” असे मत डायरेक्टर संगीता पागनीस यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ सातपुते, मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार, राजेंद्र पाचोरे, दत्तात्रय मुळे, श्रीशैल मोटगी, विनायक जोशी, प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.